तीनच दिवसांपूर्वी निवडून आलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची (डब्ल्यूएफआय) कार्यकारिणी क्रीडा मंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत बरखास्त केली. नवनिर्वाचित कार्यकारिणीने डब्ल्यूएफआयच्या घटनेचे पालन केले नाही. तसेच कुस्तीपटूंना तयारीसाठी पुरेसा वेळ न देता 15 आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची घाईघाईने घोषणा केली होती, असा ठपका क्रीडा मंत्रालयाने ठेवला.
अधिक माहिती
• नवी कार्यकारिणी पूर्णपणे माजी पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे, जे राष्ट्रीय क्रीडासंहितेनुसार योग्य नाही.
• कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांच्या पॅनलने विजय मिळविल्यावर त्याच दिवशी 15 आणि 20 वर्षांखालील राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा उत्तर प्रदेशच्या नंदिनीनगरमध्ये घेण्याची घोषणा केली. ही घोषणा घाईघाईने करण्यात आली असून कुस्तीपटूंना पुरेशी सूचना न देता निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
• केंद्र सरकारकडून नव्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच अध्यक्ष संजय सिंह यांचेही निलंबन करण्यात आले आहे.
कामकाजासाठी नवी समिती
• भारतीय कुस्ती महासंघ निलंबित केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघाला (आयओए) तातडीने निष्पक्ष समिती स्थापन करण्यास सांगितले.
• आयओएच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डब्ल्यूएफआयच्या माजी पदाधिकाऱ्यांमुळे निर्माण झालेली सद्य:स्थिती पाहता महासंघाच्या प्रशासन आणि अखंडतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. कुस्तीपटूंचे नुकसान होऊ नये यासाठी आयओएने तातडीने पावले उचलावीत.



