भारतीय नौदल आणि अन्य संरक्षण दले , राज्य सरकारच्या संबंधित विभाग आणि नागरी संस्था यांचा सहभाग असलेला ‘प्रस्थान’ नावाचा एक समन्वयित सराव 08 डिसेंबर 2023 रोजी मुंबईजवळील समुद्रातील पश्चिम विकास क्षेत्रात आयोजित करण्यात आला. खनिज तेल उत्पादन तळावर उद्भवू शकणार्या विविध आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी उपाययोजना आणि प्रक्रियांचे प्रमाणीकरण करण्यासाठी हा सराव दर सहा महिन्यांनी आयोजित केला जातो.
● या वर्षीचा सराव मुंबई बंदराच्या पश्चिमेस सुमारे 45 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या ओएनजीसीच्या R12A (रत्ना) या तळावर आयोजित करण्यात आला होता.
● या सरावासाठी भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, ओएनजीसी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि नौवहन महासंचालक यांची अनेक जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली होती.
● महाराष्ट्र पोलीस, सीमाशुल्क, मत्स्य विभाग, मुंबई बंदर प्राधिकरण, जेएन बंदर प्राधिकरण, भारत हवामान विभाग आणि इतर संबंधित राज्य आणि केंद्रीय नागरी संस्थांचे कर्मचारीही या सरावात सहभागी झाले होते.
● या सरावातील कवायती आणि कार्यपद्धती एकत्रित आणि समन्वित पद्धतीने करण्यात आल्या.
● या सरावाने या आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी सर्व संबंधित संस्थांच्या सज्जतेचे तसेच विविध संस्थांमध्ये समन्वय साधण्याच्या कार्यपद्धतींचे मूल्यांकन करण्यासाठी एक वास्तववादी परिस्थिती प्रदान केली.
● सध्या वापरात असलेल्या कार्यपद्धती सुधारण्यासाठी तसेच त्या आणखी मजबूत आणि सुधारित करण्यासाठी आवश्यक असलेल्या पैलूंचे मूल्यांकन करण्यासाठी सर्व कृतींचे तपशीलवार विश्लेषण केले जाणार आहे.



