झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला असून चंपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री असतील. आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. JMM, काँग्रेस आणि RJD विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंपाई सोरेन यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये छोटेखानी कार्यक्रमात चंपाई यांनी झारखंडचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. झारखंडच्या कोल्हान प्रांताचे ते सहावे मुख्यमंत्री ठरले आहेत.
अपक्ष म्हणून विधिमंडळात…
● जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेल्या चंपई यांनी तेव्हाच्या अखंड बिहारच्या सराईकेलामधून पोटनिवडणूक (1991) जिंकत अपक्ष म्हणून विधिमंडळात प्रवेश केला होता.
● त्यानंतर चारच वर्षांनी त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या तिकिटावर निवडणूक लढविताना भाजपच्या पंचू टुडू यांना पराभूत केले होते. पण त्यानंतर मात्र त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.
● पुढे 2005 मध्ये त्यांनी सराईकेलातून विजय मिळविला होता. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते येथून निवडून आले होते.
● अर्जुन मुंडा (2010 ते 2013) यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री देखील होते.
● हेमंत सोरेन यांनी दुसऱ्यांदा 2019 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर ते अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री बनले.



